कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. एखाद्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बाघाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाची संपूर्ण बिल्डिंगच सील करण्यात आली होती आणि आता त्यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराची बिल्डिंग सील करण्यात आली असल्याची बातमी आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवी भिडेची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत माधवीच्या भूमिकेत आपल्याला सोनालिका जोशीला पाहायला मिळते. सोनालिका कांदिवलीत राहाते. तिची बिल्डिंग काही दिवसांपूर्वी पूर्णपणे सील करण्यात आली आहे. तिनेच स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. सोनालिकाने या मुलाखतीत सांगितले आहे की, आमच्या बिल्डिंगमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर आमची बिल्डिंग सील करण्यात आली. २७ मार्चपासून आमची बिल्डिंग सील असून आम्हाला कुठेही जाण्याची परवानगी नाहीये. आम्ही घरात लागणारे कडधान्यं तसेच महत्त्वाच्या गोष्टी ऑनलाईन मागवत आहोत. वस्तूची डिलेव्हरी आली की, आम्ही बिल्डिंगच्या मेन गेटवर जाऊन वस्तू घेतो. कोणालाही सोसायटीच्या बाहेर जाण्याची अथवा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सोसायटीच्या आत येण्याची परवानगी नाहीये.