Join us

मनसेच्या दणक्यानंतर 'तारक मेहता' चा उलटा चष्मा झाला सरळ

By अजय परचुरे | Published: March 04, 2020 10:55 AM

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील संवांदावरून सुरू झालेला राडा मनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे आणि अभिनेत्याच्या माफीनाम्यामुळे शमला आहे.

ठळक मुद्देअमित भटने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लेखी माफी मागितली आहे. मनसेच्या दणक्याने मालिकेचे निर्माते झाले खडबडून जागे

सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सिरीयलच्या  प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी वाद घालताना दिसले.  ज्यात चंपक चाचांनी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख केला. आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. या आक्रमक पवित्र्याने खडबडून जाग्या झालेल्या मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागितली. आणि चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या  अमित भटने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लेखी माफी मागितली आहे. त्यामुळे मनसेच्या दणक्याने तारक मेहता का उलटा चष्मा सरळ झाल्याची भावना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. 

त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडबाबत सोशल मिडियावर तीव्र संताप व्यक्त केला होता. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोशल मिडियावरही तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात जनमानसातून तीव्र शब्दांतून टीका लिहीली जात होती. मनसेने निषेध नोंदविल्यावर सिरीयलचा निर्माता आणि चंपकलालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने  अखेर माफी मागितली. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमेय खोपकर यांनी 'हेच ते मराठीचे मारक मेहता', असं लिहित एका ट्विटर पोस्टमधून संताप व्यक्त केला होता.

मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण आहे.  आता असित कुमार मोदी यांच्यानंतर या मालिकेत चंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भटने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लेखी माफी मागितली आहे. त्याने माफीनाम्यात लिहिले आहे की, मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो.

सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशः दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल ही  विनंती अश्या प्रकारचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लिहिल्यानंतर हा वाद शमला. मात्र भविष्यात मराठीचा हा अपमान सहन करून घेतला जाणार नाही अश्या धारदार शब्दांतच अमेय खोपकर यांनी हिंदी मालिकांच्या निर्मात्यांना सूचक इशाराच दिला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा