‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचे शूटींग आता सुरु झाले आहे. मात्र या मालिकेतील नट्टू काका अर्थात घनश्याम नायक गेल्या काही एपिसोडमध्ये दिसलेले नाहीत. होय,‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे शूटींग सुरु झाले. मात्र कोरोनामुळे ते शूटींगमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. अर्थात हायकोर्टाच्या निर्णयानंतर 65 वर्षांवरील कलाकारही शूटींगमध्ये भाग घेऊ शकणार असल्याने नट्टू काका लवकरच मालिकेत परतणार आहेत. घनश्याम नायक या निर्णयाने प्रचंड सुखावले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपला हा आनंद बोलून दाखवला. शिवाय एक अंतिम इच्छाही व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील कलाकारांना सेटवर जाण्यास आणि शूटींगमध्ये सहभागी होण्यास महाराष्ट्र सरकारने मनाई केली होती. मात्र हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय बदलला. हायकोर्टाचा निर्णय माझ्यासाठी नवीन जन्मासारखा आहेत, असे नट्टू काका म्हणाले. ‘येत्या दिवसांत मी सुद्धा मालिकेचे शूटींग सुरु करेन. मी आवश्यक ती सर्व खबरदारी घेईन. शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे,’ असेही ते म्हणाले.
मी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र वयाच्या 63 व्या मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळाली. 350 सिनेमांमध्ये काम करूनही मला ती ओळख मिळाली नाही, जी या मालिकेने दिली, असेही ते म्हणाले.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि तेव्हापासून घनश्याम नायक हेही या शोचा भाग आहेत. यादरम्यान संजय लीला भन्साळी आणि करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसनेही त्यांना रोल आॅफर केले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. कारण नट्टू काका ही त्यांची सर्वाधिक आवडीची भूमिका आहे.