तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे नुकतेच 2700 भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. पण आता दिशा या मालिकेचा भाग नसून दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी नव्या कलाकाराचा शोध सुरू असल्याचे या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकतेच सांगितले होते.
दयाबेनची इतकी चर्चा असतानाच जेठालाल देखील आता चर्चेत आला आहे. जेठालाल नुकताच त्याच्या कुटुंबियांसोबत सिंगापूरला गेला होता. सिंगापूरवरून परतल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्या दुकानात जायला सुरुवात केली आहे. पण गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेल्यानंतर त्याला चांगलाच धक्का बसला आहे. कारण बाजारात एक स्वस्त मोबाईल आला असून नट्टू काका आणि बाघाने या मोबाईलची मोठी ऑर्डर घेतली आहे. इतके मोबाईल आपण आता विकू शकणार का याची जेठालालला चिंता लागली आहे.
जेठालाल चिंतेत असतानाच एका राजकारण्याचा फोन आला आहे आणि त्याने त्याला अनेक मोबाईलची ऑर्डर दिली आहे. नट्टू काकामुळे जेठालालला नेहमीच नुकसान होते. पण पहिल्यांदाच त्याचा नट्टू काकामुळे इतका मोठा फायदा झाला असल्याचे त्याला वाटत आहे. पण आता हा राजकारणी कोण आहे, त्याने इतके मोबाईल का खरेदी केले असे प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडणार आहेत. आपल्याला व्यवसायात चांगलाच फायदा झाला असे वाटत असतानाच आता या सगळ्या प्रकरणात जेठालाल अडकला जाणार असून यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.