‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. अनेक वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही. टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल राहणा-या या मालिकेच्या चाहत्यांसाठी आता मात्र एक दु:खद बातमी आहे. होय, मालिकेशी निगडीत एका सदस्याचे निधन झाल्याने तूर्तास एका दिवसासाठी मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे मेकअप आर्टिस्ट आनंद परमार यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गेल्या 10 वर्षांपासून आनंद परमार आजारी होते. पण याऊपरही ते रोज सेटवर येते. जमेल तेवढे काम करत. 12 वर्षांपूर्वी आनंद परमार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर मेकअप आर्टिस्ट म्हणून दाखल झाले होते. तेव्हापासून ते या मालिकेशी जोडलेले होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कुटुंबातील एक असलेल्या आनंद यांना सर्व जण आनंद दादा या नावाने ओळखायचे. त्यांच्या निधनाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अख्खी टीम शोकाकूल झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच टीमने एक दिवस चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला.
मालिकेत मिसेस हाथी अर्थात कोमल भाभीचे पात्र साकारणारी अंबिका रंजनकर हिने सोशल मीडियावर आनंद परमार यांच्या निधनाचे वृत्त शेअर केले. ‘दादा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. वरिष्ठ मेकअपमॅन, नेहमीच मेहनतीवर विश्वास ठेवणारे, सतत हसत राहणारे आणि तितकेच प्रेमळ, अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली.2018 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथी ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते कवी कुमार आजाद यांचे निधन झाले होते.