'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचं बेपत्ता होणं हे पोलिसांसाठी एक मोठं कोडं बनलं आहे. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी 26 एप्रिल रोजी समोर आली होती.
गुरुचरण सिंग यांचे वडील हरगीत सिंग म्हणाले की, गुरुचरण सिंग 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासात समोर आले आहे की, 22 एप्रिल रोजी गुरुचरणला दिल्ली एअरपोर्टवर जायचं होतं तेथून तो मुंबईला जाण्यासाठी विमानाने येणार होता, परंतु तो एअरपोर्टकडे गेलाच नाही.
दिल्लीतील पालमसह अनेक भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा अभिनेता पाठीवर बॅग घेऊन पायी चालताना दिसला. एवढंच नाही तर गुरुचरणने दिल्लीतील एटीएममधून सुमारे सात हजार रुपये काढले आहेत. गुरुचरणचे मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर पोलिसांना अनेक गोष्टी समोर आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता 24 एप्रिलपर्यंत दिल्लीमध्ये होता. यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. 24 तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी उपस्थित होता. तपासादरम्यान गुरुचरणचे लवकरच लग्न होणार असल्याचेही समोर आले. याच दरम्यान, तो आर्थिक संकटाशीही झुंजत होता. या सर्व गोष्टींमध्ये गुरुचरण अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर गुरुचरण सिंगची आई दीर्घकाळापासून आजारी आहेत. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याचे वडील हरगीत सिंग यांनी सांगितले की, आता ती बरी आहे आणि घरी आल्यानंतर विश्रांती घेत आहे. कुटुंबीय सध्या गुरुचरणविषयी चिंतेत आहेत. पण प्रत्येकजण सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे जात आहे. प्रत्येकाचा देवावर पूर्ण विश्वास आहे.