Join us

लता मंगेशकरांच्या गाण्याविषयी चूक करणं 'तारक मेहता..'ला पडलं महागात; मागावी लागली जाहीरपणे माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:54 AM

Taarak mehta ka ooltah chashmah: कायम प्रेक्षकांची वाहवाह मिळवणाऱ्या या मालिकेमध्ये एक मोठी चूक घडली. ज्यामुळे या मालिकेच्या निर्मिती टीमला चक्क प्रेक्षकांसमोर हात जोडून त्यांची माफी मागावी लागली.

गेल्या १३ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah). आतापर्यंत या मालिकेतील प्रत्येक भागाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे ही मालिका अबालवृद्धांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कायम प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या या मालिकेने मात्र यावेळी प्रेक्षकांची नाराजी ओढावून घेतली आहे. 

कायम प्रेक्षकांची वाहवाह मिळवणाऱ्या या मालिकेमध्ये एक मोठी चूक घडली. ज्यामुळे या मालिकेच्या निर्मिती टीमला चक्क प्रेक्षकांसमोर हात जोडून त्यांची माफी मागावी लागली. मालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत झालेल्या चुकीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

अलिकडेच या मालिकेत बाबूजी, जेठालाल आणि बागा यांना ए मेरे वतन के लोगो या गाण्याची माहिती देत असतात. यावेळी त्यांनी या गाण्याच्या प्रदर्शनाचं वर्ष चुकीचं सांगितलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी या मालिकेवर टीकेची झोड उठवली. या भागात ए मेरे वतन के लोगो हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात हे गाणं, १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युध्दाच्या वेळी भारतीय जवानांच्या त्यागासाठी कवी प्रदीप यांनी लिहिलं होतं. हे गाणं दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी १९६३ साली गायलं. त्यावेळी हे गाणं ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डोळे पाणावले होते. हाच प्रसंग सांगत असताना मालिकेत गाण्याच्या प्रदर्शनाचं वर्ष चुकीचं सांगण्यात आलं. ज्यामुळे नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलं. मात्र, चूक लक्षात येताच मालिकेच्या निर्मिती टीमने प्रेक्षकांची जाहीरपणे माफी मागितली. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार