Join us

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ने दिलेल्या दणक्यानंतर असित मोदीने दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 5:44 PM

मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

ठळक मुद्देअसित यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, मुंबई महाराष्ट्रात असून महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीच आहे यात कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. मी भारतीय आहे... मराठी आणि गुजराती देखील आहे. मी सगळ्या भाषांचा सन्मान करतो. जय हिंद... 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. अर्थात हा राडा वाढण्याआधी बापूजी चंपक लाल यांनी मध्यस्थी केली आणि मातृभाषेवरून सुरू झालेला गोकुलधाममधला राडा थांबवला. मालिकेतला राडा थांबला असला तरी बाहेर मात्र यावरून एक दुसरा ‘राडा’ सुरू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडबाबत तीव्र संताप व्यक्त केला. 

मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. असित कुमार मोदी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, भारतातील सगळ्या भाषा या आपल्या राष्ट्रीय भाषा असून मी सगळ्या भाषांचा सन्मान करतो. हम सब भारतीय एक है...

तसेच असित यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की, मुंबई महाराष्ट्रात असून महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीच आहे यात कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. मी भारतीय आहे... मराठी आणि गुजराती देखील आहे. मी सगळ्या भाषांचा सन्मान करतो. जय हिंद... 

‘आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या एपिसोडमध्ये म्हणताना दिसले होते. अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

‘मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,’ असेही अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. अमेय खोपकर यांच्या या पोस्टवर युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या. युजर्सनी ज्याने हे उद्गार काढले त्याने माफी मागावी अशा आशयाची मागणी केली होती.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा