'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेतील रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गायब होता. पोलिसांनी त्याला शोधण्याचे बरेच प्रयत्न केले. २५ दिवसांनी तो स्वत:च परत आला. तो नक्की कुठे गेला होता, का गेला होता असे अनेक प्रश्न लोकांना पडले. आता नुकतंच गुरुचरण सिंगने यावर मौन सोडलं आहे. कोणामुळे तो घर सोडून गेला याचा खुलासा तो करणार आहे.
गुरुचरण सिंगच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक प्रश्न पडले होते. त्याच्या वडिलांची तब्येतही खराब झाली होती. कुटुंबाकडून आणि पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले गेले. त्याचे बँक व्यवहार पाहिले गेलेय अखेर २५ दिवसांनी तो स्वत:च दिल्लीतील घरी परत आला तेव्हा सर्वांनी नि:श्वास सोडला. आपण धार्मिक यात्रेला गेल्याचं त्याने आल्यावर सांगितलं होतं. दरम्यान 'टाईम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंग म्हणाला, "मी याबद्दल लवकरच बोलणार आहे. मी का गायब झालो होतो, कोणी मला भाग पाडलं हे मी लवकरच सांगेन. मला थोडा वेळ द्या. सध्या मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे, आताच काही सांगू शकत नाही."
तो पुढे म्हणाला, "एकदा का सगळी प्रक्रिया संपली की मी सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं देईन. माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत. आता फक्त वडिलांच्या काही गोष्टी बाकी आहेत. सध्या निवडणुकांमुळे काम थांबलं आहे. कोर्टासंबंधित काही गोष्टी आहेत."