Join us

... तर आज तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद जिवंत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:04 PM

डॉ. लकडावाला यांनी वजन कमी करण्याचे कवी कुमार आझाद यांना अनेकवेळा सांगितले होते. पण मी स्क्रीनवर जाडा दिसलो पाहिजे, त्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही असे कवी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. 

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी 9 जुलैला मीरा रोड मधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला आहे. स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आपले करियर वाचवण्यासाठी कवी कुमार आझाद यांनी वजन कमी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. लकडावाला यांनी या वेबसाईटला ही माहिती दिली आहे. डॉ. लकडावाला यांनी वजन कमी करण्याचे कवी कुमार आझाद यांना अनेकवेळा सांगितले होते. पण मी स्क्रीनवर जाडा दिसलो पाहिजे, त्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही असे कवी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे त्यांचे वजन कमी करण्यासाठी डॉ. लकडावाला यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होते. त्यावेळी त्यांचे वजन 140 किलो झाले होते. त्यानंतर आणखी एक ऑपरेशन करून आपण वजन 90 किलोपर्यंत आणूया असे डॉ. लकडवाला यांनी कवी कुमार आझाद यांना सांगितले होते. पण अभिनय क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्यास नकार दिला. वजन कमी केल्यानंतर स्क्रीनवर ते जाडे दिसू शकणार नाहीत असे कवी कुमार आझाद यांचे म्हणणे होते. त्यावर तुम्ही पॅडिंग करून स्क्रीनवर जाडे दिसू शकता असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यावर मी माझ्या चेहऱ्यावर तर पॅडिंग करू शकत नाही ना... असे कवी कुमार आझाद यांचे म्हणणे होते. वजनामुळे तुमचा जीव धोक्यात आहे, असे त्यावेळीच डॉक्टरांनी कवी कुमार आझाद यांना समजावले होते. पण त्यांनी त्याकडे दुलर्क्ष केले आणि त्यातही काही वर्षांनी त्यांचे ऑपरेशनने कमी झालेले वजन पुन्हा 20 किलोने वाढले होते. 

टॅग्स :कवी कुमार आझादतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा