अभिनेता अजय देवगणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. अजय देवगणतानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान आहे. तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळाला.या भूमिकेसाठी अजयनेच नव्हे तर संपूर्ण स्टारकास्टने अपार मेहनत घेतली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
महाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित झाला तेव्हा याविषयी माहिती देताना अजय देवगन सांगितले होते की, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करणे हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.”
अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या भव्यदिव्य सिनेमाविषयी सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’
अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.