अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आले आहे. सध्या चित्रीकरण नसल्याने एक अभिनेता एक खूप चांगले काम करत आहे. त्याने त्याचा हा वेळ त्याच्या डॉक्टरी पेशाला दिला आहे.
अभिनेता आशिष गोखलेने गब्बर इज बॅक, लव्ह यू फॅमिली यांसारख्या हिंदी तर मोगरा फुलला, रेडी मिक्स, बाला यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिषची सोनी वाहिनीवरील तारा फ्रॉम सातारा या मालिकेतली वरुण माने ही भूमिका तर चांगलीच गाजली होती. आशिष हा आज अभिनेता असला तरी त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. डॉक्टर म्हणून काम करत असताना अभिनयाची आवड होती आणि त्याचमुळे तो अभिनयक्षेत्राकडे वळला. पण आता देशावर आलेल्या संकटामुळे त्याने त्याचे डॉक्टर म्हणून असलेले कर्तव्य पूर्ण करण्याचे ठरवले आहे. तो सध्या एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून रुग्णांची सेवा करत आहे. आशिषने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. काहीजणांचे तर खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक गरीब लोकांवर तर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.