Join us

बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी आला, आता म्हणतो- "मी परत येणारच नव्हतो, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 4:04 PM

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं  म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग मे महिन्यात बेपत्ता झाला होता. अचानक गायब झाल्यामुळे सोढीचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत होते. अखेर २५ दिवसांनी गुरुचरण सिंग घरी परतल्याने सगळ्यांची चिंता मिटली होती. पण, बेपत्ता झालेल्या गुरुचरणला मात्र घरी परतायचंच नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. 

गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं  म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो. पण, देवाचा इशारा मिळाल्यामुळे मी परतलो, असं त्याने म्हटलं आहे. "आईवडिलांमुळे माझा अध्यात्मावर विश्वास आहे. आता आयुष्याच्या या वळणावर मी अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा विचार केला होता. मी परत येणार नव्हतो. पण, देवाने मला इशारा दिला आणि त्यामुळे मी घरी परतलो", असं गुरुचरण बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

"बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की मी हा माझाच प्लॅन आहे. पण, हे खरं नाही. हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. जर मला पब्लिसिटी हवी होती, तर मी इंटरव्ह्यू देऊन तारक मेहता मालिकेच्या थकलेल्या मानधनाबद्दल बोललो असतो. यासाठी मला सोशल मीडियाचा वापरही करता आला असता. पण, मी तसं केलं नाही. घरी परतल्यानंतरही मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. पण, आता मी बोलत आहे. कारण, लोकांमध्ये असलेले गैरसमज मला दूर करायचे आहेत," असं त्याने सांगितलं. 

२२ एप्रिल २०२४ रोजी गुरुचरण सिंग बेपत्ता झाला होता. मुंबईत येण्यासाठी एअरपोर्टवर गेलेला गुरुचरण विमानात चढलाच नाही. तिथून तो कुठे गायब झाला, याबाबत कोणालाच काहीच माहिती नव्हती. त्यानंतर जवळपास २५ दिवसांनी तो स्वत:च दिल्लीतील त्याच्या घरी परतला.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार