Join us  

बेपत्ता होऊन घरवापसी झालेला 'सोढी' पहिल्यांदाच मीडियासमोर, म्हणाला- "माझा फोन बंद त्यामुळे.."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 12:07 PM

'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील सोढी अर्थात अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन घरी आल्यावर पहिल्यांदाच मीडियासमोर आला (gurucharan singh)

'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग काही महिन्यांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. गुरुचरण अचानक कुठे बेपत्ता झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. पुढे काही दिवसांनी गुरुचरणचा शोध लागला आणि तो घरी परतला. बेपत्ता झालेला गुरुचरण घरी आल्यावर पहिल्यांदाच मीडियामोर आला. मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना गुरुचरणने दिलखुलास उत्तरही दिली. 

पैसे थकबाकीबद्दल गुरुचरण काय म्हणाला?

पापाराझींनी गुरुचरणला पैसे थकबाकीबद्दल विचारलं. यावर उत्तर देताना गुरुचरण सिंग म्हणाला, "होय! बहुतेक लोकांना पैसे मिळाले आहेत. बाकी काही मला  माहिती नाही. मला काही गोष्टी विचाराव्या लागतील. परंतु बहुतेक लोकांना पैसे दिले गेले आहेत. माझा फोन सध्या बंद आहे, मी तो चालू करेन, मग मला आणखी काही गोष्टी कळतील." असा खुलासा गुरुचरणने केला.

गुरुचरण पुन्हा तारक मेहता.. मध्ये दिसणार का?

पुढे पापाराझींनी अभिनेत्याला विचारले की तो शोमध्ये परत येईल का? तेव्हा गुरुचरणने उत्तर दिले की,"हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक. मला याविषयी आत्ता काहीच माहिती नाही. होय, जर मला काही माहित असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन." गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. अभिनेत्याने मुंबईत जाण्यासाठी त्याचे घर सोडले, परंतु तो मुंबईला गेला नाही किंवा घरी परतला नाही. अशा परिस्थितीत गुरुचरणचे अपहरण झाले, असे लोकांना वाटले. पण सोढी घरी परतल्यावर तो धार्मिक यात्रेला गेला होता, याचा उलगडा झाला.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनमराठी