'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत मिस्टर अय्यर ही भूमिका साकारून अभिनेता तनुज महाशब्दे घराघरात पोहोचले. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत बबीता सारखी सुंदर पत्नी असणारा मिस्टर अय्यर खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने याबाबत खुलासा केला.
मिस्टर अय्यरची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे यांनी ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अविवाहित असल्याचं म्हणत मालिकेतील पोपटलालशी स्वत:ची तुलना केली. ते म्हणाले, "मालिकेत मला सुंदर पत्नी आहे. पण, खऱ्या आयुष्यात मी अविवाहित आहे. मी रिअल लाइफमधला पोपटलाल आहे. माझं अद्याप लग्न झालेलं नाही. पण, आता मुलाखतीत मी बोलत आहे, तर लवकरच काहीतरी सकारात्मक घडेल". कामात व्यस्त असल्यामुळे पर्सनल आयुष्यासाठी वेळ मिळत नाही का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी "असू शकतं...पण, मला नेमकं कारण माहीत नाही", असं सांगितलं.
तनुज महाशब्दे हे ४४ वर्षांचे आहेत. पण, अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील मिस्टर अय्यर आणि बबीताची जोडी लोकप्रिय आहे. या मालिकेत बबिता ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारत आहे.