छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माता असित मोदी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत. या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले शैलेश लोढा यांनी असित मोदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दोन दिवसांपूर्वीच ही केस शैलेश लोढा यांनी जिंकल्याचं वृत्त होतं. त्यामुळे असित मोदींना शैलेश लोढांना १ कोटी द्यावे लागणार आहेत, असंही समोर आलं होतं. याबाबत प्रतिक्रिया देत शैलेश लोढांनी मोठी लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. आता असित मोदींनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदींनी या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “शैलेशने कोणतीही केस जिंकलेली नाही. त्याने चुकीचं सांगितलं आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याने केस जिंकली असं म्हणता येणार नाही. शैलेशने असे आरोप का लावले, याबाबत आम्हाला प्रश्न पडला आहे. एवढी कोणतीही मोठी गोष्ट झालेली नव्हती. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
“जया बच्चन माझ्यासाठी सेटवर मटण घेऊन आल्या अन्...”, क्षिती जोगने सांगितला 'तो' किस्सा
“जेव्हा कोणताही कलाकार मालिका सोडण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला काही कागदपत्रांवर सही करावी लागते. ज्यामध्ये ते मालिकेचा आता हिस्सा नसणार, असं लिहिलेलं असतं. ही एक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक कलाकाराला करावी लागते. शैलेशने मालिका सोडल्यानंतर ही कागदपत्र सही करण्यास नकार दिला होता. आम्ही त्यांचे कोणतेही पैसे थकवलेले नाहीत. आम्ही त्याच्याबरोबर बोलून या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण, त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला आम्ही त्याचे पैसे दिलेले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे आमच्यावर केस करण्यात आली,” असंही असित मोदींनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, “शैलेशने आमच्याबरोबर १४ वर्ष काम केलं आहे. तो आमच्या कुटुंबातील एक भाग आहे. कामाव्यतिरिक्तही आम्ही त्यांना अनेकदा मदत केली आहे. त्याचा पगारही वेळेतच दिला जायचा. मालिकेत काम करत असताना त्याने आमच्याविरोधात कधीच तक्रार केली नव्हती. पण, जेव्हा त्यांनी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. त्याने कागदपत्रांवर सही न केल्यामुळे आम्ही त्याचे पैसे थकवले होते.”