कोरोना साथीमुळे सध्या अनेकांचे व्यवसायात नुकसान झाले आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. छोट्या पडद्यावर तसेच मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचे देखील प्रचंड हाल झालेले आहेत. घर चालवायला देखील पैसे नसल्याने इंडस्ट्रीतीशी निगडित असलेल्या काही लोकांनी आत्महत्या देखील केली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करणाऱ्या एका कलाकाराने गेल्या काही दिवसांत सट्टेबाजीत 30 लाख रुपये गमावले आहेत आणि या 30 लाखांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने चक्क आता चोरीचा मार्ग अवलंबला आहे. या अभिनेत्याला सोन्याची साखळी चोरताना पोलिसांनी अटक केली आहे.
या अभिनेत्याचे नाव मिराज असून त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिराजला सट्टेबाजीत प्रचंड नुकसान झाले असल्याने त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. मिराज हा जुनागडचा रहिवाशी असून निर्मनुष्य ठिकाणी महिलांना लक्ष्य करून तो आणि त्याचा साथीदार सोनसाखळी चोरत असत... महिधरपुरा, उधना आणि रांदेर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या आरोपांची कबूली दिली असून नुकसान झाल्यामुळे त्याने अनेक चोऱ्या केल्या असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.