तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील बबिताची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अतिशय स्टाईल असलेल्या या बबिताच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेत बबिताची भूमिका मुनमुन दत्ता ही अभिनेत्री साकारत आहे.
मुनमुन ही आज सिंगल असून तिचे हे आयुष्य आनंदित घालवत आहे. तिला फिरायला प्रचंड आवडते. त्यामुळे ती चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास नेहमीच कुठे ना कुठे फिरायला जात असते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मुनमुन आज सिंगल असली तरी काही वर्षांपूर्वी ती एका अभिनेत्यासोबत नात्यात होती आणि हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करायचा त्यामुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले होते अशा बातम्या गेल्या अनेक वर्षांपासून मीडियात येत आहेत.
अरमान कोहलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी तो बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते आणि त्या दोघांचे प्रेमप्रकरण चांगले गाजले देखील होते. पण अरमान आणि मुनमुन २००८ मध्ये नात्यात होते. अरमानच्या रागीट स्वभावामुळे आणि तो तिला मारहाण करत असल्याने मुनमुनने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता अशा बातम्या आजवर अनेक वर्तमानपत्रं, वेबसाईटने दिल्या आहेत. पण या बातम्यांना आता मुनमुन कंटाळली आहे.
अरमान आणि मुनमुनच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून मीडियात होत असली तरी या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण मुनमुनने काही दिवसांपूर्वी दिले आहे. या सगळ्या अफवांना ती कंटाळली असून तिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते की, माझे आणि अरमानचे अफेअर असल्याच्या खोट्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून मीडियात येत आहेत. माझ्या खाजगी आयुष्याविषी चुकीचे छापणे बंद करा अथवा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.