‘बिग बॉस’च्या लव्हर्स आणि हेटर्समधील वाक्युद्ध नवे नाही. या शोचे असंख्य चाहते आहेत. तितकेच या शोवर टीका करणारे टीकाकारही आहेत. सोशल मीडियावर अनेकदा चाहते आणि टीकाकार एकमेकांशी भिडतात. आता या वादात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता हिनेही उडी घेतली आहे. ‘बिग बॉस’वर टीका करणा-यांना तिने चांगलेच सुनावले आहे. तुम्हाला ‘बिग बॉस’ पाहायची इच्छा नसेल तर पाहू नका. पण दुस-यांना जज करू नका, असे मुनमुनने म्हटले आहे.
‘बिग बॉस’बद्दलचे मुनमुनचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. ‘बिग बॉस न पाहणा-यांना मी काही सांगू इच्छिते. हे जजमेंटल अॅटिट्यूड कशासाठी? हे अॅटिट्यूड तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. हा शो बघणा-यांपेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, असे तुम्हाला का वाटते? तुम्हाला बिग बॉस पाहायला आवडत नसेल तर हा तुमचा निर्णय आहे आणि आम्ही आवडीने पाहतो ही आमची आवड आहे. तुम्ही बिग बॉस नाही पाहत म्हणून स्वत:ला महान समजू नका. हे हास्यास्पद आहे,’ असे आपल्या पोस्टमध्ये मुनमुनने लिहिले आहे.
मुनमुनच्या या पोस्टवर सध्या असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या या मताला पाठींबा दिला आहे तर अनेकांनी यावरून तिला ट्रोल केले आहे. मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून बबिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने कमल हासन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. बबितावर लट्टू झालेल्या जेठालालप्रमाणे रसिकही तिच्या लूकवर फिदा होतात. मुनमुन दत्ता रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही ती खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात राहते. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. तिच्या आॅनस्क्रीन लूकप्रमाणे आॅफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.