Join us

या गोष्टीला नकार दिला नसता तर आज जिवंत असते डॉ. हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 6:14 PM

कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला होता.

ठळक मुद्देएक ऑपरेशन करून आपण वजन 90 किलोपर्यंत आणूया असे डॉ. लकडवाला यांनी कवी कुमार आझाद यांना सांगितले होते. पण अभिनय क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्यास नकार दिला होता. 

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे निधन 9 जुलै 2018 ला झाले होते. त्यांच्या निधनाला आज वर्षं झाले असून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. या मालिकेत त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच कोमल हाथीच्या भूमिकेत असलेल्या अंबिका रंजनकर यांनी कवी कुमार आझाद यांच्यासोबतचे चित्रीकरणाचे काही फोटो फेसबुकला पोस्ट केले आहेत.

कवी कुमार आझाद यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला होता. स्पॉटबॉय या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आपले करियर वाचवण्यासाठी कवी कुमार आझाद यांनी वजन कमी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. लकडावाला यांनी या वेबसाईटला ही माहिती दिली होती. डॉ. लकडावाला यांनी वजन कमी करण्याचे कवी कुमार आझाद यांना अनेकवेळा सांगितले होते. पण मी स्क्रीनवर जाडा दिसलो पाहिजे, त्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही असे कवी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. 

कवी कुमार आझाद यांच्या निधनाच्या आठ वर्षं आधी त्यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे त्यांचे वजन कमी करण्यासाठी डॉ. लकडावाला यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होते. त्यावेळी त्यांचे वजन 140 किलो झाले होते. त्यानंतर आणखी एक ऑपरेशन करून आपण वजन 90 किलोपर्यंत आणूया असे डॉ. लकडवाला यांनी कवी कुमार आझाद यांना सांगितले होते. पण अभिनय क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्यास नकार दिला होता. 

वजन कमी केल्यानंतर स्क्रीनवर ते जाडे दिसू शकणार नाहीत असे कवी कुमार आझाद यांचे म्हणणे होते. त्यावर तुम्ही पॅडिंग करून स्क्रीनवर जाडे दिसू शकता असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यावर मी माझ्या चेहऱ्यावर तर पॅडिंग करू शकत नाही ना... असे कवी कुमार आझाद यांचे म्हणणे होते. वजनामुळे तुमचा जीव धोक्यात आहे, असे त्यावेळीच डॉक्टरांनी कवी कुमार आझाद यांना समजावले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यातही काही वर्षांनी त्यांचे ऑपरेशनने कमी झालेले वजन पुन्हा 20 किलोने वाढले होते.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माकवी कुमार आझाद