तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. या मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्मराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचे मराठी बोलणे तर प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेत मंदार चांदवलकर आत्माराम भिडेची तर सोनालिका जोशी माधवी भिडेची भूमिका साकारते.
सोनालिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत सोनालिका महाराष्ट्रीयन पेहरावात दिसत असून आताच बया का बावरलं... या गाण्यावर दिलखेचक अदाकारी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोनालिकाच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून हा व्हिडिओ १० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या पोस्टसोबत सोनालिकाने कॅप्शन देखील खूपच छान लिहिली आहे. मराठी गाणं... मराठी पोषाख आणि मराठी मी असे तिने लिहिले असून मला याचा खूप अभिमान देखील असल्याचे सोनालिकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
सोनालिका ही एक मराठी मुलगी असून तिने मराठी रंगभूमीपासूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने तिच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण मिळवून दिले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रेक्षक सोनालिकाला माधवी याच नावाने ओळखू लागले आहेत.