कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या काही कलाकारांनी तर बेरोजगारीच्या संकटामुळे आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या या संकटामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
कोरोनाच्या या स्थितीमुळे आपल्या करियरबाबात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांना देखील टेन्शन आले आहे. त्यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, मागील एका महिन्यापासून ते घरीच आहेत. त्यांना हेदेखील माहीत नाही की, पुन्हा चित्रीकरणासाठी त्यांना कधी बोलावलं जाईल किंवा मालिकेत त्यांची व्यक्तिरेखा पुन्हा कधी दाखवली जाईल. त्यांनी शेवटचं चित्रीकरण मार्च महिन्यात केलं होतं.
नट्टू काका यांची तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भूमिका त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून ते मालिकेत कधी परतणार याची वाट त्यांचे चाहते देखील आतुरतेने पाहात आहेत. घनश्याम नायक गेली अनेक वर्षं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.