Join us  

नट्टू काका आता कधीच परतायचे नाहीत...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम घनश्याम नायक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 8:25 PM

Tarak Mehta Ka Oooltah Chashmah nattu kaka passes away : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात घनश्याम यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ठळक मुद्देघनश्याम नायक यांना वयाच्या 63 व्या मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  ही मालिका मिळाली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Oooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील नट्टू काका (Nattu Kaka) अर्थात अभिनेते धनश्याम नायक  (Ghanshyam Nayak) यांचं आज निधन झालं. दीर्घकाळापासून ते कॅन्सरला झुंज देत होते. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात घनश्याम यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अख्खी टीम शोकाकुल आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका अर्थात घनश्याम नायक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर अचानक त्यांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. यानंतर  नट्टू काकांना कॅन्सरने गाठल्याची बातमी समोर आली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घशाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या घशातून कॅन्सरच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या. यानंतर नट्टू काका बरे होऊन मालिकेत परतील, अशी आशा चाहत्यांना होती. पण ती आशा फोल ठरली. कालांतराने नट्टू काकांची प्रकृती आणखी बिघडत गेली आणि आज त्यांनी या जगातूनच कायमची एक्झिट घेतली. आता नट्टू काका मालिकेत कधीच परतणार नाहीत. नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे, असे ते म्हणाले होते.

घनश्याम नायक यांना वयाच्या 63 व्या मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  ही मालिका मिळाली. 350 सिनेमांमध्ये काम करूनही त्यांला जी ओळख मिळाली नाही, ती या मालिकेने दिली.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि तेव्हापासून घनश्याम नायक हेही या शोचा भाग होते. यादरम्यान संजय लीला भन्साळी आणि करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसनेही त्यांना रोल ऑफर केले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिला होता . कारण नट्टू काका ही त्यांची सर्वाधिक आवडीची भूमिका होती.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा