हर मर्द का दर्द या मालिकेतील झिनल बेलाणी परमित सेठीकडून घेतेय पंजाबीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 9:39 AM
हर मर्द का दर्द या मालिकेत झिनल बेलाणी प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी ती सध्या पंजाबी भाषेचे धडे ...
हर मर्द का दर्द या मालिकेत झिनल बेलाणी प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी ती सध्या पंजाबी भाषेचे धडे गिरवत आहे. तिला पंजाबी शिकवण्यासाठी दुसरे कोणी नाही तर या मालिकेचे दिग्दर्शक स्वतः मदत करत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शक परमित सेठी हे स्वतः पंजाबी आहेत. त्यामुळे झिनलला पंजाबी शिकवणे तेदेखील एन्जॉय करत आहेत.झिनल ही खऱ्या आयुष्यातही गुजराती असून हर मर्द का दर्द या मालिकेतही तिने गुजराती मुलीचीच व्यक्तिरेखा साकारली आहे. पण मालिकेत तिचे लग्न विनोद खन्ना म्हणजेच फैझल रशीद या पंजाबी माणसाशी झालेले दाखवण्यात आले आहे. तसेच मालिकेचे कथानकदेखील पंजाबमधील पटियाला या गावात घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतेय. त्यामुळे या मालिकेत अनेक पंजाबी शब्द वापरले जातात. मालिकेत काम करत असताना पंजाबी भाषेचे मूलभूत ज्ञान तरी असणे आवश्यक आहे असे झिनलला वाटत असल्याने तिने पंजाबी शिकण्याचे ठरवले. तिचे दिवसातील अनेक तास चित्रीकरणातच जात असल्याने कोणत्याही शिक्षकाकडून पंजाबीचे क्लासेस घेण्यासाठी तिच्याकडे वेळच नव्हता. त्यामुळे तिने परमितलाच तिला पंजाबी भाषा शिकवण्याची विनंती केली. याबाबत झिनल सांगते, "मला या मालिकेसाठी पंजाबी शिकण्याची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे मी परमितसरांना सहजच याबद्दल विचारले आणि त्यांनीदेखील लगेचच मला पंजाबी शिकवण्यास होकार दिला. सध्या रोज पॅकअपनंतर ते मला पंजाबी भाषेचे धडे देत आहेत. ही भाषा शिकायला सुरुवात केल्यापासून मला ही भाषा खूपच आवडू लागली आहे. मला भविष्यात वेळ मिळाला तर पंजाबी भाषेसाठी शिक्षक नेमून या भाषेतील सगळे बारकावे मी शिकणार आहे."