Join us

'पुण्यश्लोक अहिल्याबाई'मधून मिळालेली शिकवण मनात कायम जिवंत राहिल - अदिती जलतारे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:06 PM

अहिल्याबाईंची जन्मजयंती साजरी करत असताना बालकलाकार अदिती जलतारेने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अहिल्याबाई होळकर यांची आज २९६ वी जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठ्या स्तरावर समाजोपयोगी कार्य करून एक उदाहरण घालून दिले. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत छोट्या अहिल्याबाईंची भूमिका करत असलेली अदिती जलतारे या मालिकेतून बरेच काही शिकत आहे. या अवघ्या ११ वर्षांच्या बाल कलाकारात चांगल्या गुणांचे सिंचन होत असून सत्कृत्याचे सार तिला समजू लागले आहे. अहिल्याबाईंची जन्मजयंती साजरी करत असताना अदितीने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती म्हणते, “या मालिकेने मला कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावले आहे. आपण जर न थकता, न खचता काम करत राहिलो, तर आज ना उद्या आपल्याला यश मिळतेच. अहिल्याबाई होळकर ही व्यक्तिरेखा साकारताना आणि समजून घेताना मी हा एक मोठा धडा शिकले आहे.”

 अहिल्याबाई होळकरांचा प्रवास सोपा नव्हता. ज्या काळात सामाजिक रूढी आणि पुरुष प्रधानतेचा पगडा समाजमानसावर होता, त्या काळात अहिल्याबाईंनी आपल्या उदाहरणाने हे सिद्ध करून दिले की, मनुष्य त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो, जन्माने तो मुलगा किंवा मुलगी आहे, म्हणून नाही.

 अदिती पुढे म्हणते, “माझ्या दृष्टीने त्यांचा कनवाळूपणा, विनम्रता आणि त्यांच्या मनातील कृतज्ञतेची भावना हे त्यांचे गुण अत्यंत प्रेरणादायक आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे साध्य केले त्याबद्दल त्यांच्या मनात सदैव देवाविषयी कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्यात असलेला आणखी एक मोठा गुण म्हणजे, त्यांनी अत्यंत निखळ नजरेतून जगाकडे पाहिले. त्यांच्या नजरेत सर्व जण आणि सर्व काही समान होते. कोणत्याही पूर्व धारणा मनात बाळगून त्यांनी जगाकडे पाहिले नाही. निर्धाराने त्या मार्गक्रमण करत राहिल्या आणि आव्हानांना तोंड देत राहिल्या आणि असे करताना मनातील प्रेम, करुणा हे गुण त्यांनी हरवू दिले नाहीत. अहिल्याबाई होळकर एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे.” 

अदिती शेवटी म्हणाली, “मी मोठी होईन तेव्हाही, मला वाटते हे शिकलेले धडे मी विसरणार नाही. आणि माझ्या जीवनातही त्यांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करीन. जगाला आणखी सहानुभूतीची गरज आहे. अहिल्याबाई होळकर ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आणि त्यांचा प्रवास समजून घेतल्यानंतर मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे. या आठवणी आणि ही शिकवण माझ्या मनात कायम जिवंत राहील.”