आधी कोलकता, मग बदलापूर आणि आता अंबरनाथ. एकानंतर एक मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यामुळे सगळेच हादरलेत. मुली कुठे सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न सगळे विचारत आहेत. शाळेतही जर चिमुकलींवर अत्याचार होणार असतील तर खरोखरंच मुलींनी जायचं कुठे? या सर्व प्रकारावर अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही (Tejashri Pradhan) संताप व्यक्त केला आहे.
तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर 'लोकमत'ची बातमी शेअर केली आहे. 'बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नऊ वर्षांच्या मुलीचा शौचालयात नेत विनयभंग' अशी ती बातमी आहे. यावर तेजश्री लिहिते, "अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणारे...समाजात भिती पेरायची वेळ आली आता..जागे व्हा".
तेजश्रीने ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. समाजात महिलांवरील अत्याचाराविरोधात आता जागं व्हायची आणि लढायची वेळ आली आहे. आणखी किती दिवस मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली वाहणार असा प्रश्न संतप्त देशवासीय विचारत आहेत. अशा प्रकरणांमध्येही राजकारण आणत आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय जे अतिशय दुर्देवी आहे. यावर अनेक कलाकारांनी आतापर्यंत संताप व्यक्त केला आहे.