Join us

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 8:52 AM

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Ashvini Mahangade : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशातच मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. दरम्यान, सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहत असताना एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकतीच राजकारणात एन्ट्री घेतली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे ( Ashvini Mahangade )आहे. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. अश्विनी महांगडेने राष्ट्रवादीच्या शरद पवार(Sharad Pawar) गटात प्रवेश केला आहे.

अश्विनी महांगडे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे राजकीय मत मांडताना दिसते. तसंच तिची छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. तिला 'शिवकन्या' असंही चाहते संबोधतात. अशातच आता अश्विनीने तिची नवी इनिंग सुरू केली आहे.  अभिनेत्रीवर शरद पवार गटात महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  सातारा येथील वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यात अश्विनी महांगडेने पक्षप्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अश्विनी महांगडेने त्यात लिहलंय,  'माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिमेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..

टॅग्स :अश्विनी महांगडेटिव्ही कलाकारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारणसोशल मीडिया