Join us

प्रेक्षकांना भावुक करणं सोपं, पण...; अनिता भाभीने सांगितली विनोदी भूमिका साकारण्यामागील मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 4:39 PM

Vidisha srivastava: अनिता भाभी या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. सध्या ही भूमिका अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव साकारत आहेत.  

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं'. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मात्र, अनिता भाभी या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. सध्या ही भूमिका अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव साकारत आहेत.  या भूमिकेच्या निमित्ताने तिने पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्येच प्रेक्षकांना रडवणं सोपं आहे. मात्र, हसवणं तितकंच कठीण असं ती म्हणाली.

 "अनिता भाभी ही भूमिका प्रचंड गाजली आहे. त्यामुळे मला ही भूमिका साकारायला मिळते हे ऐकूनच मला प्रचंड आनंद झाला होता. ही भूमिका माझ्या वाट्याला येईल असं कधी वाटलं नव्हतं. या मालिकेच्या निमित्ताने शुभांगी अत्रे, आसिफ शेख या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली", असं विदिशा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एक कलाकार म्‍हणून माझे मत आहे की तुम्‍ही नवीन आव्‍हान स्‍वीकारले नाही, नवनवीन गोष्‍टी शिकल्‍या नाहीत आणि त्‍यामध्‍ये सामावून गेला नाहीत तर तुम्‍ही सुस्‍त होऊन जाल. मी नेहमीच नवीन शैली, विशेषत: विनोदी शैली साकारण्‍यास उत्‍सुक आहे. मी काल्‍पनिक, पौराणिक, ऐतिहासिक व रोमँटिक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण यावेळी मी विनोदी शैली साकारण्‍यासाठी मनाने तयारी केली, ज्‍यामुळे मला माझ्या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडण्‍यास मदत झाली. विनोदी ही सर्वात अवघड शैली आहे. प्रेक्षकांना भावूक करणे सोपे आहे, पण हसवणे तितकसं सोपे नाही. प्रेक्षकांना हसवण्‍यासाठी अभिव्‍यक्‍ती, विनोदाची वेळ व देहबोली असे अनेक पैलू महत्त्वाचे असतात आणि विनोदीशैली उत्तमरित्‍या करण्‍यासाठी या पैलूंवर खूप मेहनत घ्‍यावी लागते."

दरम्यान, काही काळापूर्वीच या मालिकेत विदिशाची एन्ट्री झाली आहे. मात्र, अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. यात खासकरुन मालिकेतील तिची स्टाइल, ड्रेसिंग सेन्स प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार