Tu Hi Re Maza Mitwa :स्टार प्रवाह वाहिनीवर एकामागोमाग नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका सुरु करण्यात आली आहे. अभिनेता अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'तू ही रे माझा मितवा' मध्ये भिन्न स्वभावाचे असलेले ईश्वरी सरदेसाई आणि अर्णव यांचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळणार का? हे पाहण्यात प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, लवकरच या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर 'तू ही रे माझा मितवा' मालिकेच्या एका फॅनपेजवरुन मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक नवीन चेहरा पाहयला मिळतोय. 'बिग बॉस' फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची झलक या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसते आहे.
अलिकडेच 'ठरलं तर मग' या मालिकेत रुचिरा जाधव एक पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीची नव्याकोऱ्या मालिकेत वर्णी लागली. इतकंच नाही तर रुचिराने सुद्धा सोशल मीडियावर खास स्टोरी पोस्ट करत "Yes This is Happenning..." असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुचिरा जाधवला मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. दरम्यान, 'तू ही माझा मितवा' मालिकेत रुचिरा कोणत्या भूमिकेत दिसणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.