कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मनोरंजन विश्वातील अनेकांवर उपासमारीची पाळी आलाी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शूटींग, इव्हेंट सगळेच ठप्प असल्याने सध्या प्रत्येक नवे कलाकार, स्पॉटबॉय, रोजंदारीवर काम करणारे लोक अशा सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता एक अभिनेत्री सुद्धा आर्थिक संकटात सापडली आहे. आपल्या आईच्या उपचारांसाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे चाहत्यांसमोर मदतीसाठी हात पसरण्याची वेळ तिच्यावर आली आहे.
या अभिनेत्रीचे नाव आहे नुपूर अलंकार. नुपूर सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतेय. तिची आई आजारी आहे. मात्र आपल्या आजारी आईवर उपचार करण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. अशात तिने तिने क्राऊड फंडिंगचा मार्ग स्वीकारला आहे. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून तिने आर्थिक मदत मागितली आहे.
लॉकडाऊनआधी नुपूरला पीएमसी बँक घोटाळ्याचा फटका बसला होता. तिचे या बँकेत अकाऊंट होते. मात्र घोटाळा उघडकीस आल्यावर बँकेतील अकाऊंट फ्रिज झाले बँकेतून पैसेही काढता येईना, डेबिट कार्ड-क्रेडिट कार्ड काहीही वापरता येत नव्हते. इतर बँकेतून कर्जही मिळत नव्हते. घरात एकही पैसा उरला नसताना अखेर घर चालवण्यासाठी नुपूरने दागिने विकले. मित्रमैत्रिणींकडून उधारीवर पैसे घेतले. यानंतर कोरोना आणि लॉकडाऊन आले. यामुळे नुपूरच्या अडचणींत आणखी भर पडली.
नुपूरची आई निशी चंद्रिका खट्टर आजारी आहे. त्यांना ILD हा फुफ्फुसाचा आजार आहे. याशिवाय मधुमेह, रुमेटाइड आर्थरायटिस, अँजायना देखील आहे. त्यांना 4 हार्ट अटॅकही येऊ गेलेत. त्या सध्या पूर्णपणे बेडवर असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. इतका पैसा आता उभा करायचा कसा असा प्रश्न नुपूरला पडला. त्यामुळे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून तिने हा पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला.