Join us  

"तेव्हा मी २० वर्षांची होते अन् त्याने मला"; 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 11:32 AM

अभिनेत्री आशा नेगीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल भयानक अनुभव सांगितला आहे. 

Asha Negi : अभिनेत्री आशा नेगी हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत तिने साकारलेलं पूर्वी देशमुख नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने आशा नेगी हे नाव घराघरात पोहचलं. आता आशा ओटीटी विश्वात पाऊल ठेवत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

'हॉटरफ्लाईला' दिलेल्या मुलाखतीमध्ये आशा नेगीने कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक अनुभव सांगितला. त्यादरम्यान आशा म्हणाली, "त्यावेळी माझं वय साधारणत: २० वर्ष इतकं असेल. तेव्हा कोऑर्डिनेटर्स असायचे. मी सुद्धा एका कोऑर्डिनेटर्सला भेटले होते. त्यावेळी त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं. खरं सांगायचं झालं तर, त्याने माझं मतपरिवर्तन करण्यास सरुवात केली, म्हणाला पुढे जायचं असेल तर असंच केलं जातं. त्याने मला स्पष्टपणे सांगितलं अभिनेत्री व्हायचं असेल तर हे सगळं तुला करावंच लागेल".

पुढे आशाने म्हटलं," मला त्याचा नक्की हेतू काय होता ते समजलं होत. त्यामुळे मी त्याला स्पष्टच सांगितलं, जर अभिनेत्री होण्याकरिता असं काही करावं लागत असेल तर मला असं  काहीही करायचं नाही. त्यावेळी मी मोठ्या हुशारीने परिस्थितीवर हाताळली. शिवाय या घडलेल्या प्रकारामुळे मी खूप घाबरले होते. त्यानंतर आशा म्हणाली, मी हा सगळा प्रकार माझ्या मित्राला सांगितला. पण, यावर त्याची प्रतिक्रिया काही वेगळीच होती. त्यावेळी तो मला म्हणाला, हे सगळं होतंच राहतं आणि या गोष्टी नॉर्मल आहेत". 

आशा नेगीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंर बारिश या मालिकेतही तिने काम केलं आहे. सध्या अभिनेत्री हनीमुन या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. यामध्ये अभिनेत्रीने अंबिका नावाच्या एका फोटोग्राफरची भूमिका निभावली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा