Join us

१६-१७ तास काम अन् तीन चार महिने पैसेच नाही, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीनं सांगितलं कटू सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 4:18 PM

कोणतीही सिनेसृष्टी दूरवरुन कितीही छान वाटत असली तरी आतमध्ये मोठा स्ट्रगल आणि कष्ट असतात. त्यातही कष्टाचे फळ मिळेलंच असंही नाही.

कोणतीही सिनेसृष्टी दूरवरुन कितीही छान वाटत असली तरी आतमध्ये मोठा स्ट्रगल आणि कष्ट असतात. त्यातही कष्टाचे फळ मिळेलंच असंही नाही. अनेकदा मराठी कलाकारांनी वेळेत मानधन मिळत नसल्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मालिकेत काम करत असतानाच मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे. मराठी अभिनेत्री राधिका विद्यासागर यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे.

स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत सारिकाच्या आत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राधिका विद्यासागर यांनी नुकतंच सिनेसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. राधिका एका मुलाखतीत म्हणाल्या, 'प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव येतात. पण या क्षेत्रात तुम्हाला खात्रीने काम मिळतं. नशिबाने मला चांगल्या भूमिका तसेच चांगली लोकं मिळाली. काही किरकोळ वाईट अनुभवही आले, पण त्यातून मी नेहमी पुढे शिकत राहिले.'

त्या पुढे म्हणाल्या.'मात्र सिनेसृष्टीचं एक कटू सत्य आहे ते म्हणजे या क्षेत्रात कधीच वेळेत पैसे मिळत नाही.अनेकांना महिन्याच्या शेवटी पगार मिळायची सवय असते. पण इथे तसं होत नाही. तीन चार महिन्यांनी तुम्हाला तुमचं मानधन मिळतं. ही या क्षेत्रातील सर्वात वाईट गोष्ट आहे. हे कसं बदलेल मला माहिती नाही. पण हे सत्य आहे. १५ ते १६ हे कामाचे तास असतातच. मात्र या क्षेत्राला जेवढं ग्लॅमर मिळतं तेवढेच कष्टही घ्यावे लागतात. पण हे क्षेत्र उत्तम आहे हे नक्की.'

याआधीही अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी, अभिनेत्री मृणाल दुसानिस, अभिनेता शशांक केतकर यांनी वेळेत मानधन मिळत नसल्याचा मुद्दा उचलला आहे. सिनेसृष्टीतील हे वास्तव वेळोवेळी समोर येत असल्याचं दिसतंय.

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाह