सोनी सबवरील प्रसिद्ध मालिका 'तेनालीरामा' आपल्या चतुर कथा व कथानकांद्वारे प्रेक्षकांना अधिकाधिक मजेशीर अनुभव देऊन खिळवून ठेवत आहे. पंडित रामकृष्ण त्याच्या गावाचे रक्षण करण्यासाठी केवळ आपली विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता वापरून सर्व वाद सोडवत आहे. यातील आगामी कथानक नाट्याची मजा आणखी वाढवणार आहे. अण्णाचार्य (दीपक काझीर) आता रामाचा (कृष्णा भारद्वाज) तोतया सुदामा याला सोबत घेऊन येत आहे आणि त्याने रामाचे अपहरण करून न्यायसभेतील त्याची जागा घेतली आहे. पुढे राजा कृष्णदेवरायाला (मानव गोहिल) ठार मारण्याचा कट त्याने रचला आहे.
अण्णाचार्याचा कट माहित असलेली धनी मनी येत्या काही भागांत त्याचा भाऊ तथाचार्याला (पंकज बेरी) अण्णाचार्याच्या या कुटील कारस्थानाबद्दल सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, अम्मा आणि गुंडाप्पा यांना रामाचा तोतया सुदामाचा आधीच संशय येऊ लागला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते अखेर त्याची खरी ओळख उघड करतात. दरम्यान, रामाला दौलत खानाच्या ताब्यातून सुटकेचा मार्ग सापडतो आणि तो शारदासह आपल्या घरी पोहोचतो. मात्र, सुदामाला हातात तलवार घेऊन समोर उभा बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. रामाच्या कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याचा सुदामाचा बेत असतो. सुदामा हातात तलवार घेऊन समोर उभा असताना आता राम आणि त्याचे कुटुंबीय स्वत:चे संरक्षण कसे करतील?राम आणि सुदामा अशा दुहेरी भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज म्हणाला, “दुहेरी भूमिका करणे हे आव्हानात्मक काम आहे, त्यात त्यातील एक व्यक्तिरेखा अत्यंत सुसंस्कृत असा मुखवटा घेतलेली, तर दुसरी काहीशी धांदरट असेल तर विचारायलाच नको. अर्थात आगामी घटनाक्रम खूपच आश्चर्याचे धक्के देणारा आहे. आपल्या कुटुंबाला तसेच राजाला वाचवण्यासाठी राम त्याच्या तोतयाला कसा हाताळतो हे बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी नक्कीच मेजवानी असेल.”