'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असते. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांना आवडते. 'ठरलं तर मग' मालिकेत चैतन्य ही भूमिका साकरून अभिनेता चैतन्य सरदेशपांडे घराघरात पोहोचला. या मालिकेने चैतन्यला लोकप्रियता मिळवून दिली. चैतन्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
चैतन्य करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतंच त्याने स्कुबा डायव्हिंग केली. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. चैतन्यला पाण्याची भीती वाटते. तरीदेखील त्याने स्कुबा डायव्हिंग केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओत तो घाबरत घाबरत समुद्रात उतरताना दिसत आहे. "जेव्हा तुम्हाला पाण्याची भीती वाटते...पण नंतर Hydrolovebia होतो. अंडरवॉटर जाणं हे नक्कीच एक मेडिटेशन आहे", असं चैतन्यने पोस्टमध्ये म्हटलं आहे. चैतन्यच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.
चैतन्य हा ज्येष्ठ अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. चैतन्य अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखकही आहे.'दुरुस्त', 'घेमाडपंथी' या चित्रपटांची पटकथा त्याने लिहिल्या आहेत. अनेक सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सध्या तो 'ठरलं तर मग'मध्ये अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत आहे.