Join us

'मॅडम उठा आता..'; लग्नाच्या पंगतीतून जुई गडकरीला भरल्या ताटावरुन होतं उठवलं, सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 07:51 IST

Jui gadkari: जुई गडकरीला चारचौघांमध्ये जेवणाच्या पंगतीतून उठावं लागलं होतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). उत्तम अभिनय आणि लोभसवाणा चेहरा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. 'पुढं पाऊल', 'तुजवीण सख्या रे', 'बिग बॉस मराठी','सरस्वती' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकत तिने लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून जुई सातत्याने तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. यामध्येच तिने एका लग्नात तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे.

अलिकडेच जुईने 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिला एका लग्नात भरलेल्या जेवणाच्या ताटावरुन उठवलं होतं असं तिने सांगितलं. 

"मला लग्नातलं जेवण फार आवडतं. खासकरुन मसालेभात आवडतो. लग्न तर पुण्यात असेल. आणि, तिथल्या पारंपरिक मंगलकार्यालयात लग्न असेल तर तिथं जेवण जेवायला मला जास्त आवडतं. एकदा तर पंगत उठून गेल्यावर मला एका पॉइंटला सांगण्यात आलं की, मॅडम उठा आता. मला मसालेभात प्रचंड आवडतो. त्यामुळे जर लग्नाचं जेवण जेवायचं असेल तर मी मुद्दाम उपवास वगैरे करु शकते. कारण, मला बटाट्याची भाजी, पुरी. जिलेबी आणि मसालेभात हे पारंपरिक पदार्थ खूप आवडतात. आणि, खासकरुन पंगतीत बसायला आवडतं", असं जुई म्हणाली.

दरम्यान, जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती सायली ही भूमिका वठवत आहे.

टॅग्स :जुई गडकरीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार