'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे. मोनिकाने १५ मार्चला गोंडस बाळाला जन्म दिला. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर बाळाचा पहिला फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. खरं तर मोनिकाची डिलिव्हरी एप्रिल महिन्यात होणार होती. पण, काही कारणांमुळे डॉक्टरांनी तिला लवकर डिलिव्हरी करण्याचा सल्ला दिला. यामागचं कारण मोनिकाने तिच्या युट्यूब व्हिडिओवरुन चाहत्यांना सांगितलं आहे.
मोनिकाने डिलिव्हरीनंतर तिच्या युट्यूबवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने डिलिव्हरी लवकर करण्यामागचं कारण सांगितलं आहे. मोनिका म्हणते, "माझी डिलिव्हरीची तारीख ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होती. बाळाचं वजन ३ किलोच्या आसपास आहे. पण, याच्यावर आता मी सहन करू शकत नाही. तुम्हाला दिसत असेल तर माझं पोटही स्ट्रेच होतंय. माझं वय आता ३५ आहे. त्यामुळे मला ते सहनही होत नाहीये. त्यात मुंबईत उन्हाळा इतका वाढलाय की एसी लावूनही रूम फार थंड होत नाहीये. मला काहीच जेवणही जात नाहीये. मला सारखं बर्फाचं पाणी प्यावंसं वाटतं. मला फक्त संध्याकाळी बरं वाटतं. बरं चिन्मयचं लागोपाठ शूट सुरू आहे. त्यामुळे तो रात्रीच घरी येतो. त्यामुळे दिवसभर मला त्रास होतो. जीव घाबराघुबरा होता. हे अत्यंत नैसर्गिक आणि सामान्य आहे".
पुढे ती म्हणाली, "हे सगळं डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला की आपण डिलिव्हरीची तारीख थोडी लवकर घेऊ शकतो. जेणेकरून तुला फार त्रास होणार नाही. पण, जर तुला नैसर्गिक पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर मग तुला मार्च अखेरपर्यंत थांबावं लागेल. पण, मला हे शक्य होईल असं वाटत नाही. मी खूप अॅक्टिव्ह राहण्याचाही प्रयत्न करते. घरातील कामंही करते. पण, गरमीमुळे मला हे आता सहन होत नाहीये".
"१ मार्चला मला नववा महिना लागला. बाळाचं वजन चांगलं आहे. माझं बीपीही नॉर्मल आहे. त्यामुळे मला डॉक्टरांनी २-३ तारखा दिल्या आहेत. ज्या दिवशी डिलिव्हरी करू शकतो. त्यातली एक तारीख मी घेतली आहे. काही लोकांना हे पटणार नाही. बाईपण आहे, सहन केलं पाहिजे, कळा काढल्या पाहिजेत हे सगळं बरोबर आहे. पण, मला आता हे सहन होत नाहीये. मला खूपच त्रास होतोय. मला झेपत नाहीये. त्यामुळे डॉक्टरांना विचारून आम्ही निर्णय घेतला आहे", असंही पुढे मोनिका म्हणाली.