Jui Gadkari Surgery : 'पुढचं पाऊल' अन् 'ठरलं तर मग' या मालिकेतील गुणी अभिनेत्री घराघरांतल्या स्त्रियांची लाडकी ऑनस्क्रीन सूनबाई म्हणून मिरवत आहे. स्वत:च्या खऱ्या नावापेक्षा जुईला सर्वत्र 'कल्याणी', 'सायली' अशी ओळख मिळाली आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या जुई गडकरीवर (Jui Gadkari ) नुकतंच शस्त्रक्रिया पार पडली आहे. खुद्द जुईने याबाबत चाहत्यांना माहिती दिली.
जुई गडकरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये जुईने शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलं, 'शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केल्यावर मी कशी दिसते, केवळ हे पाहण्यासाठी काही सेल्फी काढले आहेत. कदाचित हे सेल्फी नंतर डिलीटही करेन किंवा नक्कीच डिलीट करेन! तोपर्यंत फॉलो करत राहा आणि बघत राहा ठरलं तर मग'.
जुईच्या या पोस्टवर चाहत्यांना विविध प्रतिक्रिया देत काळजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपुर्वीच जुई रुग्णालयात दाखल झाली होती. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या हातावर सलाइनची सुई दिसून आली होती. त्यानंतर आता सेल्फि शेअर करत तिने चाहत्यांना अपडेट दिलं आहे. पण, कोणती शस्त्रक्रिया तिच्यावर झाली हे, तिने सांगितलेले नाही.
आजारपणासाठी जुईने ब्रेक घेतल्याने 'ठरलं तर मग' ( Tharala Tar Mag) मालिकेच्या आगामी एपिसोड जुई पाहायला मिळणार नाही. प्रियाने जिन्यावरुन धक्का दिल्याने जुईचा अपघात होतो, असा ट्वीस्ट कथानकामध्ये दाखवला जाणार आहे. याचा प्रोमोही शेअर करण्यात आला आहे. खऱ्या आयुष्यात जुई आजारी असल्याने अशाप्रकारचा ट्वीस्ट दाखवण्यात आला आहे. २८ ऑगस्ट रोजी हा एपिसोड पाहायला मिळेल. जुईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन जुई चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही जुई चाहत्यांना देत असते.