छोट्या पडद्यावर सध्या जुई गडकरी (jui gadkari) हे नाव चांगलंच गाजत आहे. पुढचं पाऊल या मालिकेच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या जुईने ठरलं तर मग या मालिकेमुळे तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना एक सूचनावजा सल्ला दिला आहे.
जुईने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एका मांजरीसोबत खेळत आहे. मालिकेचं शुटिंग सुरु असतांना ही मांजर त्यांच्या सेटवर आली. त्यामुळे तिचे लाड करण्याचा मोह जुईला आवरला नाही. त्यामुळे तिने तिच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. मात्र, हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये कमेंट करणाऱ्यांसाठी एक सल्लाही दिला आहे.
नेमकं काय म्हणाली जुई?
''ज्यावेळी तुम्ही तुमच्या बाळांना (घरी असलेल्या मांजरींना) मिस करता, तेव्हा अशा रस्त्यावरील क्युटीजची जास्त काळजी घ्या. या क्युटीला आज सेटवर भेटले, तिच्या पाठीवरुन मायेने हात फिरवण्यापासून मी स्वत:ला रोखू शकले नाही. माझ्या बाळांची खूप खूप आठवण येतीये", असं जुईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबतच तिने एक तळटीपही दिली आहे.
जुईने दिला नेटकऱ्यांना सल्ला
"रस्त्यावरच्या प्राण्यांना हात लावू नकोस, असे मेसेज किंवा कमेंट करु नका. कारण, मी लावणार आणि त्यानंतर कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा मला माहित आहे", असं म्हणत जुईने रागाच्या इमोजी या तळटीपसोबत दिल्या आहेत.
दरम्यान, जुईला प्राण्यांविषयी खास आपुलकी असून यापूर्वीदेखील तिने अशा प्राण्यांसोबतचे व्हिडीओ, फोटो शेअर केले आहेत. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.