जुई गडकरी (jui gadkari) हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही. छोट्या पडद्यावर जुईने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. सोज्वळ, सालस असलेली कर्जतची ही लेक आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी तिला तिच्या रंगरुपावरुन हिणवलं. इतकंच नाही तर अनेकांनी तिच्या बोलण्याच्या पद्धतीची खिल्ली सुद्धा उडवली.
अलिकडेच जुईने कॉकटेल मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असतांना तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगावर भाष्य केलं. सेटवर अनेकदा लोकांनी तिची खिल्ली उडवली असंही तिने यावेळी सांगितलं.
नेमकं काय घडलं जुईसोबत?
"मला आयुष्यात अनेक वाईट, निगेटिव्ह अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. आता इंटरनेटमुळे आपण बॉडी शेमिंगचा मुद्दा उचलून धरतो. पण, मला माझ्या उंचीवरुन, रंगावरुन अनेकदा बोललं गेलंय. मी ज्या पद्धतीने बोलते त्याच्यावरुनही मला अनेकदा चिडवल गेलंय. जेव्हा एखादी २०-२१ वर्षाची मुलगी या फिल्डमध्ये नवीन आलेली असते तेव्हा तुम्ही तिला तिच्या रंगावरुन, तिच्या दिसण्यावरुन बोलता त्यावेळी त्या व्यक्तीला कसं वाटत असेल हा विचार जराही कमेंट करणारा माणूस करत नाही. पण ही खूप चुकीची गोष्ट आहे", असं जुई म्हणाली.
पुढे ती म्हणते, "ए काळी आली, काळी आली, कटरस्टँण्ड म्हणून हिला वापरा असं खूप काही बोललं गेलंय मला. त्यावेळी मला माझा रंग बदलावा असं खूप वाटायचं. मग मी घरी जाऊन स्क्रब क्रीम जोरजोरात माझ्या चेहऱ्यावर घासायचे. त्यावेळी मी खूप प्रेशरमध्ये होते. कारण, १०० लोकांच्या युनिटसमोर सतत मला माझ्या रंगावरुन बोललं जायचं."
स्क्रब क्रीममुळे झाला चेहरा खराब
"सतत स्क्रब केल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आले होते. बोट ठेवायलाही जागा नव्हती. मी लोकल पार्लरमध्ये जाऊन वेज पिल्स करुन घेतलं. पण, त्याचाही उपयोग झाला नाही. एक वेळ अशी आली की, मी चेहऱ्यावर मेकअपच करु शकणार नाही असं मला डॉक्टरांनी सांगितलं. कारण, चेहऱ्यावरील पिंपल्स बरे व्हायला ७-८ महिने लागणार होते. पण, तरी सुद्धा मला सेटवर मेकअप करावा लागत होता."
चाहत्याच्या कमेंटमुळे केला स्वत:चा स्वीकार
"मी कुठल्या तरी इव्हेंटला गेले होते. तिथे एक अनोखळी व्यक्ती मला भेटले आणि त्यांनी माझ्या दिसण्याचं, माझ्या अभिनयाचं कौतुक केलं. तू छान काम करतेस. स्क्रिनवरही छान दिसतेस. इतर गोऱ्या मुलींपेक्षा तुझे फिचर्स खूप छान दिसतात, असं ते मला म्हणाले. मग मी घरी आले आणि मी आईला सगळं सांगितलं. तेव्हा मी स्क्रिनवर स्वत:ला नव्याने बघायला शिकले. तेव्हा मला असं जाणवलं की, हो मी स्वत:ला स्क्रिनवर आवडतेय आणि मग हळूहळू मला कळायला लागलं की, स्वत:च्या स्कीनमध्ये कन्फर्टेबल असणं म्हणजे काय असतं किंवा स्वत:ला स्वीकारणं म्हणजे काय असतं. त्यानंतर मी कधीच गोरं होण्याचा प्रयत्न केला नाही. आणि, निगेटिव्ह कमेंटला तर आता मी भीकही घालत नाही."