स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेचे नवीन पर्व सुरु झाले आहे. मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतला आहे. पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहे, त्यासोबतच मालिकेतली अनेक नवीन पात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.राजमाची भूमिका अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) हिने साकारली आहे.
मृण्मयी ही मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. हीच आवड जोपासत तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. नृत्याची आवड आणि अभिनयाच्या वेडापायी तिने मुंबई गाठली. मृण्मयीने अनेक रिऍलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे आणि ती विजेतीही ठरली आहे. अनेक मालिकांमध्येही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिली मालिका आहे. इतक्या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अश्या शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली.
राजमा बोलू शकत नाही. न बोलता भावना व्यक्त करणं आव्हानात्मक आहे. अश्या पद्धतीचं पात्र मृण्मयीने याआधी साकारलेलं नाही. त्यामुळे राजमा साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत असल्याचं मृण्मयी म्हणाली. राजमा बोलू शकत नाही. लहान असताना तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली. राजमाचा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? याची कमालीची उत्सुकता आहे.