मुंबई - इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू होताच मालिका मागे पडतात आणि घरोघरी क्रिकेटचा खेळ रंगू लागतो. त्यामुळेच या काळात मोठे हिंदी चित्रपट किंवा नवीन मालिका येत नाहीत, पण यंदा मात्र मनोरंजन वाहिन्यांनी कंबर कसली असून, सात नवीन मालिका आणल्या आहेत.
विक्रमी २५०० कोटी रुपयांमध्ये प्रसारणाचे हक्क विकली गेलेली आयपीएल नुकतीच सुरू झाली आहे. क्रिकेटच्या या रणधुमाळीत नियमितपणे मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची अडचण होते. अबालवृद्धांना आयपीएलचे वेड असते, पण गृहिणींना मालिकांमध्ये काय घडणार याची उत्सुकता असते. टिव्हीवर मात्र आयपीएल सुरू असते. तरीही 'सुख कळले', 'इंद्रायणी', 'घरोघरी मातीच्या चुली', 'साधी माणसं', 'नवरी मिळे हिटलरला', 'पुन्हा कर्तव्य आहे' या नवीन मालिका आल्या आहेत. 'येड लागलं प्रेमाचं' हि मालिका येणार आहे. फेब्रुवारीत 'पारू' आणि 'शिवा' या मालिका सुरू झाल्या आहेत. 'इंद्रायणी'मध्ये संदिप पाठक, अनिता दाते व सांची भोयर हे कलाकार आहेत, तर 'सुख कळले'मध्ये स्पृहा जोशी व सागर देशमुखची जोडी आहे. 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये राकेश बापट, पल्लवी विराज मुख्य भूमिकेत असून, अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये आहेत. रेश्मा शिंदे-सुमित पुसावळे हि जोडी 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये, तर 'साधी माणसं'मध्ये शिवानी बावकर व आकाश नलावडे आहेत. विशाल निकम आणि पूजा बिरारी यांच्या 'येड लागलं प्रेमाचं'चा प्रोमो लवकरच येणार आहे. याबाबत झी मराठी वाहिनीच्या मुख्य अधिकारी व्ही. आर. हेमा म्हणाल्या की, क्रिकेटच्या या हंगामासाठी आम्ही कंबर कसली असून आता आठवड्याचे सातही वार जोरदार मनोरंजन होणार आहेत. या कथा प्रेक्षकांमध्ये ओढ निर्माण करणाऱ्या असल्याची खात्री आहे. यातील अनोख्या व्यक्तिरेखा आणि कथांमधील ताजेपणा प्रेक्षकांना क्रिकेटच्या मैदानातून मालिकांकडे परत आणतील यात शंका नाही. नावीन्यपूर्ण कथानक सादर करण्यावर आमचा फोकस आहे. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते, पण मनोरंजन महत्त्वाचे असते. आतापर्यंत प्रेक्षक म्हणून जे काही वाटायचे ते मला इथे करण्याची संधी मिळत आहे. वेगवेगळे विषय मांडत असल्याने नवीन मालिका प्रेक्षकांमध्ये कुतूहल जागवत आहेत. आव्हाने सगळीकडेच असतात. त्यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. मायबाप रसिकांवर विश्वास आहे. - केदार शिंदे (दिग्दर्शक, प्रोग्रॅमिंग हेड, कलर्स मराठी)
आसा आहे टिआरपीचा खेळ?मागच्या वर्षी आयपीएलचा टिआरपी ५.१, तर मालिकांचा २.५ ते ३च्या आसपास होता. या काळात मालिकांचे प्रेक्षक रिपीट टेलिकास्टला प्राधान्य देतात, पण ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडियाच्या (बार्क) मानांकनानुसार प्राईम टाईममधला टिआरपी मोजला जात असल्याने मालिकांना त्याचा फायदा होत नाही.