Join us

'जीव झाला येडापिसा'मधील रांगडा शिवा दादा पुन्हा एकदा येतोय भेटीला, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 4:14 PM

Ashok Phal Desai : जीव झाला येडापिसा या मालिकेतून लोकप्रिय झालेला रांगडा शिवा दादा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई पुन्हा एकदा भेटीला येत आहे.

कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेतून लोकप्रिय झालेला रांगडा शिवा दादा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाई पुन्हा एकदा भेटीला येत आहे. कलर्स मराठीवरील नवीन मालिका कस्तुरीमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भावा बहिणीच्या नात्यावर आधारीत कस्तुरी मालिका आहे. ही मालिका २६ जूनपासून सोम ते शनि रात्री १०.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

मालिकेमध्ये कस्तुरी आणि निलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा ‘करुणा’ हा स्थाई भाव आहे. निलेश कस्तुरीचा धाकटा भाऊ. अत्यंत हुशार पण संतापी आहे. निलेश समर कुबेर याच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. समर अत्यंत महत्वाकांक्षी. काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून धाकवण्याची ईच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. पण निलेशला कस्तुरीचा विरोध आहे. एकता लबडे कस्तुरीची भूमिका साकारणार असून निलेशची भूमिका दुष्यंत वाघ. तर समर कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई साकारणार आहे. 

घरी परतल्यासारखंच आहे...

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अशोक म्हणाला, कलर्स मराठीवर पुन्हा एकदा काम करणं म्हणजे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखंच आहे. मी गेल्या तीन- चार वर्षांत ज्या भूमिका केल्या त्या ग्रामीण बाजाच्या होत्या. यावेळी पहिल्यांदा मी पूर्णपणे वेगळ्या ढंगाची, वेगळ्या बाजाची भूमिका करतोय. वेगळ्या प्रकारची भूमिका तीही कलर्स मराठी सारख्या प्लॅटफॉर्मवर याचा मला खूप आनंद आहे. आताची भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आणि या पात्रासाठी  मी खूप तयारी केलीये, करतोय. मला अशी वेगळ्या प्रकारची भूमिका करतांना आनंद मिळतोच आहे पण तुम्हाला सर्वांना पण ही भूमिका बघायला खूप आवडेल याची मला खात्री आहे. या आधी तुम्ही जीव झाला येडा पिसा मालिकेमधल्या शिवा या पात्रावर भरभरून प्रेम केलंत तसं कस्तुरी या मालिकेवर आणि या मधल्या समर कुबेर या पात्रावर असेच प्रेम करावे ही इच्छा आहे. 

भूमिकेबद्दल...

तो पुढे म्हणाला की, श्री अधिकारी ब्रदर्स या नावाजलेल्या प्रोडक्शन हाऊसशी मी जोडला गेलोय याचा मला खूप आनंद आहे. समर कुबेर या पात्राबद्दल सांगायचं  झालं तर तो खूप स्मार्ट आहे, शिकलेला आहे, श्रीमंत घरातला आहे. त्याचा त्याच्या घरच्यांवर खूप जीव आहे, सर्वांना मान देणारा आहे. फॅमिली बिझनेसमध्ये आहे पण त्याला राजकारणात प्रचंड रस आहे. तो एक निस्वार्थी राजकारणी आहे. लोकांची सेवा करणारा, अडल्या नडल्याना मदत करणारा आहे. विचार करून निर्णय घेणारा असा हा समर कुबेर आहे. येतोय मी दुप्पट ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.