Join us  

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात या प्रसिद्ध गायकाची होणार एन्ट्री, अंबानीच्या लग्नात त्याच्या गाण्यावर थिरकले बॉलिवूडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 9:05 AM

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 5)चा पाचव्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. नुकतेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शोसंदर्भात अभिनेत्याने काही खुलासा केला. या शोचा प्रीमियर २८ जुलैला होणार आहे. दरम्यान आता या शोमध्ये कोण कोण स्पर्धक असणार, हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. त्यात नुकतेच वर्षा उसगावकर आणि प्रणव रावराणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात आता आणखी एक प्रसिद्ध गायक या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. हा गायक दुसरा तिसरा कुणी नसून गुलाबी साडी या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावणारा संजू राठोड (Sanju Rathod) आहे. सध्या त्याचे नावदेखील चर्चेत आहे.

वर्षा उसगावकर यांनी चार वर्षे चालू असलेल्या स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला नुकताच निरोप दिला आहे. मालिका सोडण्यामागचे कारण त्यांनी दिले नसले तरी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठीच त्यांनी मालिका सोडल्याचे बोलले जात आहे. तर कलर्स मराठीवरुन 'बिग बॉस मराठी ५' शेअर केलेल्या पोस्टमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणाऱ्या स्पर्धकाबद्दल एक हिंट देण्यात आली आहे. "दोस्तीच्या दुनियेतला यार, एक नंबर कलाकार! कोण आहे हा?" असं म्हणत ही पोस्ट केली गेली होती. त्यामुळे योगेश शिरसाट आणि प्रणव रावराणे हे कलाकार जाऊ शकतात, असा नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.

तर तिसरा स्पर्धक हा एक प्रसिद्ध गायक, गीतकार असणार हेही आता स्पष्ट झाले आहे. १२ जुलै रोजी जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक मराठी सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. या लग्नाच्या वरातीत एका मराठमोळ्या गायकाने गाणं गायलं होतं आता हाच गायक मराठी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. हा तोच गायक आहे ज्याने गेल्या वर्षी सोशल मीडियावर गुलाबी साडीमुळे धुमाकूळ घातला होता.  

संजू राठोड गेली काही वर्षे त्याच्या सुरेल गाण्यांमुळे चर्चेत आला आहे. जळगावच्या या तरुणाला संगीताची विशेष आवड आहे. यातूनच त्याने काही गाणी प्रेक्षकांसमोर आणली होती, पण गुलाबी साडीमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. वर्षभरात त्याच्या या गाण्याला जगभरात नावाजले गेले. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटरसुद्धा त्याच्या गाण्यावर रील बनवताना दिसले. 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुख