सध्या सिनेइंडस्ट्रीत सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. नुकतंच अभिनेता निखिल राजेशिर्के विवाहबंधनात अडकला. त्यानंतर शाकालाका बूमबूम फेम अभिनेता किंशूक वैद्यने २२ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर आता 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)ही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या केळवणासाठी कलाकारांनी काय काय तयारी केली आणि काय धमाल केली, हे सगळं पाहायला मिळत आहे. यावेळी रेश्माने उखाणादेखील घेतला. रेश्मा म्हणाली की, भेटला पहिल्यांदा तेव्हा त्याने विचारले व्हॉट इज युअर नेम, तुम्हा सगळ्यांचं असंच राहू दे माझ्यावर प्रेम. या व्हिडीओत हर्षदा खानविलकर, ऋतुजा बागवे, शाल्मली तोळ्ये, सुयश टिळक, अनघा भगरे, आशुतोष गोखले, तन्मय जंगम हे कलाकार दिसत आहेत.
रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, #माझकेळवण केळवणाच्या पानात जसे वेगवेगळे पदार्थ असतात, प्रत्येकाचा रंग वेगळा असतो,चव वेगळी असते, काही आंबट काही गोड काही झणझणीत तर काही चटपटीत..एखादा पदार्थ नसला तर पान अपूर्ण राहतं.. अगदी तसंच माझं नातं या सगळ्या माझ्या माणसांबरोबर आहे..माझ्या माणसांचा हात धरून नवीन आयुष्याची सुरुवात करतेय.. ब्राइड टू बी ला ला ला... ब्राइड टू बी ला ला ला...लालाला..लब यू ऑल मुव्वा.
रेश्माच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसोबत कलाकारांनीदेखील कमेंट्स केले आहेत. अनघा अतुलने लिहिले की, अशीच या रिलसारखी हॅप्पी राहा. आमचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. दीपाला अखेर तिचा कार्तिक मिळाला आहे. मी अशीच आयुष्यभर श्वेता सारखी त्रास देत राहीन. विदिशा म्हसकरने म्हटले की, हा व्हिडीओ मी सारखा बघतेय. खूप खूप खूश राहा डार्लिंग. आता कुठे जाणार जाऊन जाऊन. चिडायचं पण इथेच,रडायचं पण इथेच आणि खळखळून हसायचं पण इथेच. तर चाहत्यांना तिचा होणारा नवरा कोण आहे, हे जाणून घ्यायचे आहे.