सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आदिशक्ती हटके विषय आणि वेगळ्या धाटणीमुळे चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार तिच्या अभिनय कौशल्याने पात्रांना जिवंत करण्यात यशस्वी ठरले आहेत, प्रत्येक पात्र आपले काम चोख पार पाडताना दिसत आहे आणि त्याच सोबत मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच छोटीशी शक्ती म्हणजेच 'आदिती' सुद्धा मागे नाही. हुशार, समंजस, धाडसी, गोंडस आदिती प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दुष्ट आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडलेली छोटी 'आदिती' समोर उभी ठाकलेली दिव्य पार पाडत नेहमी सरस आणि उजवी ठरताना दिसते आणि हे करत असताना तीच्या सोबतीला असलेली 'आई आदिशक्ती' तिला मदत करते. आदिती नेहमी सकारात्मक ऊर्जेने भारलेली दिसून येते, तशीच ही भूमिका तितक्याच ताकदीने आणि ऊर्जेने पेलणारी कलाकार म्हणजेच सावी प्रियेश केळकर.
इतक्या लहान वयात समंजस व हुशार असणे ही खरं तर कौतुकाची बाब आहे. लहान मुले आपल्या सकारात्मक ॲक्टिंगमुळे प्रेक्षकांची मन अगदी पहिल्या पासूनच जिंकत आले आहेत. त्यात आपली अभिनयातील आणि मालिका विश्वातील अनुभवी कलाकारांच्या सोबतीने अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या सावी केळकर हीने 'आदिशक्ती' मालिकेला चार चांद लावले आहेत आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'आदिती' हे महत्वपुर्ण पात्र साकारणे सोप्पी गोष्ट मुळीच नाही, सावीने मात्र 'आदिती' हुबेहूब साकारली आणि यश संपादन केले. हे पात्र आणि मालिका करत असताना सावीचा नवखेपणा कुठेच दिसून येत नाही. अनुभवी कलाकारांप्रमाणेच तीचे अभिनय कौशल्य दिसून येत आहे. 'आदिशक्ती' ही सावीची पहिलीच मालिका.
जी ऊर्जा आदिती मध्ये दिसून येते तशीच ऊर्जा सावीमध्ये सुद्धा दिसते. ही चिमुरडी राहते 'बदलापूर'ला आणि शूटिंग करते 'मढ'मध्ये. अभिनयाप्रती असलेली धडपड सुरू होते ती इथूनच, लांबचा पल्ला गाठताना लोकल, मेट्रो आणि बस असे वेगवेगळे प्रवास करत सेटवर पोहोचून उत्साहाने आदितीचे पात्र साकारणे सोप्पे नाही, मात्र सावी हे लीलया करते. कलाकारांचे आयुष्य खरेतर खूप कठीण असते. त्यात त्यांना आपल्या जवळचा माणसांची साथ असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सावी या बाबतीत खूप लकी ठरली आहे. सावीला यासाठी आई, बाबा आणि कुटुंबीयांची देखील उत्तम साथ लाभते. आई, बाबा, केळकर कुटुंबाप्रमाणेच आदिशक्ती मालिकेच्या सेटवर असलेले निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, चॅनेल टीम आणि सेटवरील संपुर्ण टीम देखील सावीसाठी एक कुटुंब बनले आहे. जितकी मेहनत आदिती हे पात्र निभावताना सावी करते. तितकीच मेहनत घेऊन सेटवर मिळालेल्या वेळेत शालेय अभ्यास करताना सावी दिसते.