सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्ल्युन्सर म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर. मालवणी भाषेतील व्हिडीओ करुन तिने नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. युट्यूब गाजवल्यानंतर अंकिताने हळूहळू करत कलाविश्वात पदार्पण केलं आहे. मराठीतील काही गाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांदेखील तिने हजेरी लावली. त्यानंतर आता लवकरच ती एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे.
प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा 'तूच मोरया' हा नवा म्युझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या अल्बममध्ये प्रसिद्ध इन्फ्ल्युन्सर विशाल फाळे तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच या अल्बममधील अंकिताचा लूक आऊट झाला आहे. हा अल्बम येत्या २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वानी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे. आयुष्यात आपण नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार अधिक करतो त्यामुळे साहजिकच सकारात्मक दृष्टिकोन काहीसा डावलला जातो. ह्याच धर्तीवर एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो अशी या गाण्याची संकल्पना आहे.