गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा तुफान गाजलेला 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १० वर्षांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम सुरु होत असून याच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हजेरी लावणार आहे. सध्या या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो समोर येत आहेत. यात राज ठाकरे त्यांच्या शैलीत अनेकांना फटकारत आहेत. यामध्येच आता त्यांनी द केरळ स्टोरी या सिनेमाविषयी भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांना 'द केरळ स्टोरी' या सिनेमाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. "केरळ स्टोरी सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली आहे. तर सिनेमांवर बंदी घालणे योग्य कि अयोग्य?", असा प्रश्न अवधूत गुप्तेने राज ठाकरेंना विचारला. त्यावर ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
"जर सेन्सॉरने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं असेल तर विरोध करणारा मी कोण?", असं राज ठाकरे म्हणाले. तसंच एखाद्या सिनेमाला विरोध करणं चुकीचं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, द केरळ स्टोरी हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासूनच चर्चेत आला होता. यात सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही मोठा वादंग निर्माण झाला. अनेकांनी या सिनेमाला कडाडून विरोध केला. तर, दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजलाही. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.