'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांना येत्या ३ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी' वाहिनीवर प्रसारीत होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक समोर आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेची प्रतीक्षा आहे. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत 'आई तुळजाभवानी'चे पात्र साकारणार आहे. बलाढ्य महिषासुराचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशा या 'आई तुळजाभवानी'ची महागाथा लवकरच 'कलर्स मराठी' वाहिनी घेऊन येत आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता- तुरजा – तुळजा…… ते अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला याची प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असलेली गोष्ट या महागाथेत उलगडणार आहे.
अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले,महिषासुर आणि देवीचे चाललेल प्रदीर्घ काळ युद्ध नेमके कसे लढले गेले. दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच पण त्याच बरोबर देवीला पृथ्वीतलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वीवर भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजारुपातली पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गमतीदार नातेही पाहायला मिळेल.
प्रसंगी योद्धा, पत्नी आणि अनंतकाळ माता रूपात भेटणाऱ्या देवीच्या तामस , राजस आणि सात्विक शक्तींचा प्रत्यय देणारा आणि तुळजाभवानी देवीच्या आईपणाची साक्ष देणारा आहे हा देवीच्या अवताराचा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरणार आहे. पार्वती मातेच्या या अवतारापाठी जनसामान्यांना प्रेरणा देण्याची दैवी रचना होती म्हणूनच मातेच्या कर्तव्याने प्रत्येकाचे आत्मबळ जागृत करणाऱ्या आपल्या आईची ही गोष्ट ‘आई तुळजाभवानी’ पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.