स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'(Tharala Tar Mag)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नामागचे सत्य खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. मात्र चैतन्य हे सगळं गुपित साक्षी समोर उलगडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण साक्षी हळूहळू चैतन्यवर प्रेम दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. साक्षीच्या कारस्थानात चैतन्य मात्र पुरता अडकणार की वेळीच सावध होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे(Chaitanya Sardeshpande)ने साकारली आहे.
चैतन्यने वयाच्या ४ वर्षापासून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. नाट्य स्पर्धा, एकांकिकामधून त्याने उत्कृष्ट अभिनयाची, लेखनाची बक्षिसं मिळवली आहेत. यातूनच पुढे त्याला चित्रपट, मालिकेतून व्यावसायिक नाटकातून झळकण्याची नामी संधी मिळत गेली. चैतन्य सरदेशपांडे या कलाकाराला अभिनयाचे बाळकडू त्याच्या घरातूनच मिळालेले आहे. चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे.
धनजय सरदेशपांडे हे नाट्य, चित्रपट अभिनेते आहेत. नुकतेच ते झी मराठीवरील चंद्रविलास मालिकेतून नाना आजोबांची भूमिका साकारत आहेत. नाटकाचे वेड त्यांना खूप वर्षांपासून होते. नाटक लिहिणे, दिग्दर्शन करणे हे त्यांचे आवडते छंद होते. फारच टोचलंय हे त्यांनी सादर केलेलं एकल नाट्य खूप लोकप्रिय झालेलं पाहायला मिळालं.
ठोंब्या ठोंबीची गोष्ट, संगीत दहन आख्यान, कातळडोह, आदिंबाच्या बेटावर, जाईच्या कळ्या अशा बाल नाट्यांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच काही नाटकातून त्यांनी भूमिकाही साकारल्या आहेत. नुकतेच त्यांनी पोस्ट ऑफिस उघडं आहे मालिकेतून आमदाराची भूमिका साकारली होती. राजा राणी ची गं जोडी, चंद्रविलास मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. आपल्या मुलाने बुद्धिमत्तेच्या आणि अभिनयाच्या जोरावर या सृष्टीत नाव कमावलं, याचा धनंजय सरदेशपांडे यांना सार्थ अभिमान आहे.