Join us

‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा आगामी सीझन लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 6:59 PM

‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ (India: Marvels And Mystries) या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

हिस्ट्री टीव्ही १८ च्या ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ (India: Marvels And Mystries) या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली तथ्ये, रहस्ये, कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा, मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या डॉक्युसिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. ही उत्तरे शोधण्यासाठी भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा, पुरातन वास्तू यांना भेटी देण्यात आल्या असून काळाच्या उदरात गाडली गेलेली उत्तरे शोधून बाहेर काढली जाणार आहेत. या प्रयत्नातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत. 

हजारो लाखों वर्षांपूर्वीची मानवी संस्कृती, भारतातील साम्राज्ये, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी कोणतीही प्रगत साधने नसतानाही निर्माण केलेल्या वास्तू हे सगळं या डॉक्युसिरीजमधून आपल्याला पाहाता येईल. डॉक्युसिरीजचा प्रत्येक भाग हा अर्धा तासांचा असून यामध्ये भारताच्या विविध भागांचा इतिहास त्याच्याशी निगडीत रहस्ये,  गूढ, अगम्य बाबी अशा असंख्य गोष्टींचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.   ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपलची सुरुवात ४ जानेवारी, २०२४ पासून होणार आहे. ही डॉक्युसिरीज एक्स्लुझिव्हली हिस्ट्री टीव्ही १८ वर पाहता येणार आहे. दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९ वाजता या मालिकेतील नवा भाग आपल्याला पाहायला मिळेल. 

ही सीरिज आहे ७ भागांचीया मालिकेचा उद्देश हा भारताच्या संपन्न आणि वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेणे हा आहे. ही मालिका सात भागांची असून ही मालिका प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरणारी आहे. या मालिकेमध्ये इतिहास डोळ्यासमोर जिवंत  उभा राहावा यासाठी नाट्यरुपांतरणे करण्यात आली असून यामुळे त्या काळातील वेशभूषा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती कशी असावी याचा अंदाज बांधता येऊ शकेल.  भारतामध्ये काही निर्माण कामे अशी करण्यात आली आहे, जी पाहताना आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान हाताशी नसतानाही ती कशी उभी करण्यात आली असतील असा प्रश्न पडतो. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या काळात, साम्राज्यांमध्ये, महत्त्वाचे ठिकाणे असलेल्या मात्र आता फारशा परिचित नसलेल्या भागांना भेटी देऊन तिथलाही इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देखणे ग्राफिक्स, जुने फोटो, डोळ्याचे पारणे फेडणारी दृश्ये आणि खिळवून ठेवणारे सादरीकरण यामुळे ही मालिका अतिशय सुंदर बनली आहे.

ही सीरिज ४ जानेवारीपासून येणार भेटीलाइतिहासाच्या पुस्तकात आपले नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या व्यक्ती कशा होत्या, त्यांनी केलेले काम काय होते हे या मालिकेद्वारे दाखवण्यात आले आहे. उत्कृष्ट निवेदन, इतिहासकारांनी मांडलेली तथ्ये आणि महत्त्वाचे म्हणजे विल्यम डॅलरिंपल यांचे सादरीकरण यामुळे ही मालिका प्रेक्षणीय झाली आहे. भारतासह जगभरातील नव्या पिढीला भारताचा इतिहास किती समृद्ध आणि वैभवशाली होता याची झलक दाखवण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. भारतामध्ये आजही अशी वास्तूशिल्पे आहेत जी जगात इतर कुठेही पाहायला मिळत नाही. या वास्तूंची आणि शिल्पांची वैशिष्ट्यता काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे हे या मालिकेतून समजण्यास मदत होईल. ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपल’ ४ जानेवारी २०२४ पासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९ वाजता फक्त हिस्ट्री टीव्ही १८ वर पाहायला मिळेल.